पथ्य आहार संकल्पना आणि आयुर्वेद : भाग २ 

मागील भागामद्धे आपण पोळी, वरण, भात यांबद्दल आपण सविस्तरपणे बघितलं. या भागात विविध फळ भाजी, पालेभाज्या त्यांच्या बनवण्याची साधारण कृती, विविध प्रकारच्या चटण्या  आणि त्यांचा पथ्य विचार बघूया .

भाजी:

दुधी भोपळा, पडवळ , भेंडी, दोडका,घोसाळे,गिलके, तोंडले,पांढरे वांगे,काकडी, नवलकोल, कोबी, फ्लॉवर, कोहळा, केळफुल,श्रवणघेवडा या भाज्या नित्य प्रकारे जेवणात घेऊ शकता.  

घेवडा, पावटा, शेवगा (शेवग्याची शेंग), गवार या भाजी सुद्धा बेताच्या प्रमाणात आहारात असू द्याव्या.

मग ह्याचं का असा पण प्रश्न येऊ शकतो. पहिले मुख्य कारण या सर्व भाज्या फळ भाजी या वर्गामध्ये मोडतात. वरील फळ भाज्या ह्या वनस्पतींना फळ स्वरुप उत्पन्न होतात. फळ सदृश असल्याने त्या त्रिदोष शामक, मल आणि मूत्र यांना अवरोध न करणार्‍या तसेच पचायला हलक्या असतात. अशा प्रकारे या सर्व भाज्या पथ्यकर  ठरतात.

भाजी बनवण्याची कृती:

भाजी करतांना त्यांना स्वच्छ धुवून चिरुन, साजूक तूप किंवा तेल मध्ये  जिरे, मोहरी, आलं- लसूण घालून, हळद, मीठ आणि लाल तिखटची फोडणी घालून मंद आचेवर शिजू द्यावी. गरम मसाला, विविध प्रकारच्या ग्रेवि यांचा वापर टाळावा.

पाले भाजी:

राजगिरा, साधा माठ, लाल माठ, चवळी, या भाजी चालतील. तसेच पालक, मेथी, शेपू इत्यादि भाजी कमी प्रमाणात चालतील.

वरील पैकी भाजी स्वच्छ धुवून, चिरुन , साजूक तूप किंवा तेल मध्ये  जिरे, मोहरी, आलं- लसूण घालून, हळद, मीठ आणि लाल तिखटची फोडणी घालून मंद आचेवर शिजू द्यावी.

असिडिटी, तसेच पोटात आग किंवा जळळ, घशात आंबट पानी किंवा पोटासंबंधी इतर कुठलेही आजार असताना टाळाव्या  किंवा  वैद्य सल्ल्यानुसार पालेभाजी आहारात समाविष्ट  कारव्या.

साधारण नियम:

भाजी करताना साधारण तूप किंवा तेलाची फोडणी द्यावी . हिरवी मिरची एवजी लाल तिखट कमी प्रमाणात घ्यावे. जास्त मसाले किंवा ग्रेवी, खूप सारण लावून किंवा हरभरा पीठ पेरून (बेसन लावून) भाज्या करु नये.

चटण्या:

साधारणपणे तीळ, जवस, खोबरे, शेंगदाणा किंवा कडीपत्ता  ह्यांपैकी कुठलीही एक कोरडी चटणी, जेवतांना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. प्रमाण एक किंवा दोन छोटे चमचे प्रमाणात घ्यावे. ज्या लोकांना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे दुखणे आहे त्यांनी वरील चटण्या जेवणात समाविष्ट कराव्यात.

*(पित्ताचा त्रास असणार्‍या लोकांनी शेंगदाणा चटणी टाळावी आणि तिखटाचे प्रमाण कमी ठेवावे.)*

अशा प्रकारे या लेख मालिकेतील भागात आपण काही महत्वाचे पदार्थ बघितले.जेवणाच्या  ताटातील इतर पदार्थ क्रमशः ………..